विद्या भारती देवगिरी प्रांत शिक्षा संस्थानाने आयोजित पायाभूत शिक्षण प्रशिक्षण वर्गाच्या समारोपात प्रांत व विदर्भ संघटन मंत्री श्री. शैलेश जोशी बोलत होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि आचार्य प्रशिक्षणामुळे पुढची पिढी भारताविषयी गौरव बाळगणारी बनेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. पालक इंग्रजी माध्यमाचा आग्रह धरीत असले तरी त्यांना समजावून सांगणे हे आचार्यांचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले.
‘‘प्रवाहाच्या विरोधात जाऊन मातृभाषेतून शिक्षण देण्याचा आग्रह आपण धरला पाहिजे,’’ असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रशिक्षणात बालकाचा पंचकोषात्मक विकास व व्यष्टी ते परमेष्ठी विकास या संकल्पनांवर भर देण्यात आला.
देवगिरी प्रांतातील बहुतांश कुटुंबे मराठी भाषिक आहेत. त्यामुळे शिशुवाटिका व प्राथमिक स्तरावर मराठी माध्यमातून संस्कार व संकल्पना स्पष्ट करणे, हे येथील शाळांचे नैसर्गिक सामर्थ्य आहे.
संदर्भ: सत्यजित न्यूज